हॅपी मदर्स डे💐

"आई,आय लव्ह यू".असं कधी मी आईला म्हंटलेलं आठवत नाही.मला देखील कधीच आईने मला "आय लव्ह यू"म्हंटलेलं आठवत नाही.अव्यक्त प्रेम,जे व्यक्त न करता जिच्या प्रत्येक कृतीतून जाणवत रहातं असे प्रेम फक्त आईच करू शकते.तिचं ओरडणं,तिचं रागावणं,तिचं काळजी करणं,तिचं वाट पहाणं सगळं फक्त आपल्या प्रेमापोटी!!!
"देवाला फूल वहायला चुकेन,पण तुझ्यासाठी प्रार्थना करायला नाही विसरत गं,तू सुखी रहा" असं सतत म्हणणारी माझी आई🤗😘.
कुठलीच आई गळ्यात अशी पाटी लावून नाही फिरत की मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करते.तिच्या प्रत्येक कृतीतून ते जाणवत असतं.
जन्मदात्री आई म्हटलं म्हणजे हे सर्व ओघाने आलंच.तुझ्यासाठी 'आई'हा एकच शब्द पुरे आहे तुझी महती सांगायला.जगाच्या पाठीवर कुठल्याच भाषेत आई ह्या शब्दातील गोडवा नाही हे मात्र खरे.तुला शुभेच्छा देण्यास शब्द हीअपुरे पडतात.पण तरीदेखील आजच्या स्पेशल दिवसाच्या तुला स्पेशल शुभेच्छा आई💐.हो आणि आत्ताच्या पिढीसारखे आय लव्ह यू😊😍🤗😘
खरं तर प्रत्येक स्त्री मध्ये निसर्गतःच एक आई दडलेली असते.कुठल्या न कुठल्या रूपात तीआपल्याला भेटत असते.अशा काही स्त्रीया ज्याआपल्याला तशी माया लावतात.आपल्या आयुष्यात अशा कित्येक स्त्रिया असतात.
म्हणतात ना "माय मरो मावशी जगो"
माझी माईमावशी,खरंतर खूप कमी बोलते ती माझ्याशी आत्ता ,पण मला माहीती आहे माझी इत्यंभूत माहीती असते तिला.माझा बर्थ डे आजतागायत कधीच विसरत नाही .पूर्वी आॅफिस मधून घरी येताना न चुकता चाॅकलेट्स घेऊन यायचीस.तू तसं दाखवत नाहीस तरीही मला माहीत आहे माईमावशी आजही तुला माझी काळजी असते❤.तसही आई आणि माईमध्ये फरक तो काय असतो गं.
हेमा मावशी शाळेत जाताना रोज मला घट्ट दोन वेण्या घालून द्यायचीस.तुझ्याकडून आजही कधीच मी रिक्त हस्ताने परतत नाही.
ताई मावशी,सुनीमावशी,जीजीमावशी,मागच्या काही दिवसांत माझ्यावर जो काही प्रसंग बेतला त्यानंतर वेळोवेळी तुम्ही मला सांत्वना दिलीत.अगदी आईच्या मायेने दिलासा दिला.चित्रा मावशी आणि मी रात्री कितीतरी उशिरापर्यंत गप्पा मारत असू.
लहानपणापासून मामाकडे राहिल्याने मला मामाकडचा ओढा जरा जास्त आहे.
माझी मोठी मामी म्हणजे शशीमामी अगदी काॅलेजला जाताना सुध्दा माझ्या लांबसडक केसांची सागरवेणी घालायची तुझ्या त्या मऊशार हातांचा स्पर्श मला आजही जाणवतो. प्रमिलामामी ,निशामामी तुम्ही सर्वजणींनी खूप प्रेम दिले मला.
शर्मिलामामी तुझ्या माझ्यात मामी भाचीचे नाते आहे केवळ म्हणून तू माझी मामी पण खरं तर आजहीआपण मैत्रिणीच जास्त आहोत. 🥰
"केव गं तुला आठोण बिठोण पडते का नय म्हाई?कवातरी आतुला बगीत यांसं".😊अशी आमच्या वाडवळ भाषेत हक्काने तक्रार करणारी आमची माईआत्या,आजही माहेरी गेल्यावर आपल्या स्वयंपाक घरातून एकतरी खास पदार्थ माझ्या पानात आग्रहाने वाढणाऱ्या माझ्या उषाकाकी,दादी,कुसुमकाकी सर्वच मला आईच्या ठिकाणी आहात.
आणि अगदी आवर्जून उल्लेख करावा अशी साऊची अम्मी❤ मी लेबर रूममध्ये बाळंतपणाच्या कळा सोसत असताना माझा हात हाती घेऊन माझे केस सारखे करीत डोक्यावर हात फिरवत मला धीर देणारी अम्मी.आज तू हयात नाहीस पण तुझीआठवण मात्र नेहमी येते.तुझ्या स्वतःच्या चार मुलीअसताना माझी ओळख इतरांना करून देताना"माझी पाचवी मुलगी अशी करून द्यायचीस.
तुम्ही सर्व जणींनी नेहमीच माझ्यावर आईप्रमाणे माया केली. म्हणून तुम्हा सर्वांचा मला इथे अगदी नावानिशी उल्लेख करावासा वाटला.खरं तर ही एक औपचारिकता झाली तशीही मी तुमची उतराई होऊ शकत नाही.तुम्हा सर्वांची माया अशीच कायम रहावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐
वृषाली रूख्सार🌸

Comments

Popular posts from this blog

मेनोपाॅज

रिश्ते