मळभ
आज झाडांना पाणी देताना विभा अगदी खुषीत येऊन गात होती'एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी........
त्याला कारण ही तसेचहोते म्हणा ,लग्नानंतर तब्बल सहा वर्षांनी तिच्या ओठांवर गाण्याच्या ह्या ओळी खऱ्या अर्थाने खुलून येत होत्या.आज तिचे प्रेग्नंसी रीपोर्ट पाॅजिटीवआले होते.आणि घरात अगदी सर्वच आनंदात होते
           खर तर विभा आणि विहंगचा प्रेमविवाह.दोघेही एकाच ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होते.चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी घरात सुबत्ता होती.विहंग लाडाकोडात वाढलेला आईबाबांचा एकुलता एक मुलगा.आता एकच अपत्य म्हणजे साहजिकच आईबाबांच्या सर्व अपेक्षा त्यावर केंद्रीत असतात.लग्नाला सहा वर्षे होऊनही विभाला दिवस रहात नव्हते.डाॅक्टर,वैद्य सर्व  औषधोपचार झाले पण काही गुण येत नव्हता.त्याबरोबर पूजापाठ व्रतवैकल्यही
 चालू होती.विभाची कुस लवकर उजवावी आणि घरात दुडदुड धावणारी चिमुकली पावले यावीतअशीओढ सर्वांनाच लागली होती.आणि आज सर्वांचीच प्रार्थना फळाला येत होती.
सासूबाईंचे कोडकौतुक नौरोबाचे प्रेम.विभाला सर्व अगदी फुलाप्रमाणे जपत होते.विभाचे डोहाळे पुरवणे ,तिला काही हवं नको ते पाहणे सासूबाई अगदी जातीने लक्ष घालीत होत्या.हे खाऊ नकोस ते खा. अमक्याने पित्त होतं उलट्यांचा त्रास होईल.गरम प्रकृतीचे पदार्थ खाऊ नकोस. सारख्या सुचना.गर्भसंस्कारांची पुस्तके ,सी.डींचा नुस्ता ढिग लागला होता.बाळाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.माहेराहून आई बाबा ,भाऊ वहिनीचे सारखे फोन चालू असायचे ते निराळेच!!!!!
         विभाला तूर्तास कुठलाच धोका पत्करायचा नव्हता.त्यासाठी ऑफिस मधून तिने सरळ सुट्टीच घेतली होती.सर्व काही व्यवस्थित चालले होते.सातव्या महिन्यात रुटीन चेकअप आणि सोनोग्राफी साठी विभा आणि विहंग डाॅक्टरांकडे गेले होते,
घरी आल्याआल्याच सासूबाईंनी विभाला विचारले,"काय गं विभा सातव्याची सोनोग्राफी ना? समजलेच असेल काय आहे ते ,मुलगा की मुलगी?"विभाने चमकून त्यांच्याकडे पाहीले!आज त्यांचा स्वर जरा वेगळाच भासला.तिला काही सुचेनासे झाले .क्षणार्धात ती हिरमुसली. म्हणाली "नाही आई डाॅक्टर असे काहीच म्हणाले नाहीत,आणि तसही गर्भलिंग तपासणी कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे डाॅक्टर सुध्दा नाही सांगत आता आणि त्याने काय फरक पडतो.बाळ सुदृढ आहे,सर्व काही ठीक आहे." विभा म्हणाली.
तसे नाही गं,पहिल्या खेपेस मुलगा झाला म्हणजे वंशाचा दिवा घरात आला,दुसर्‍या खेपेस मुलगी झाली तर हरकत नाही,मुलगी म्हणजे काय शेवटी परक्याचे धन गं!!!!!!!
विभा अचंबित होऊन सासूबाईंकडे पहात राहीली.काय  बोलावे काही सुचेच ना .
           विहंग आपल्या आईचे आणि विभाचे संभाषण ऐकत तिथेच उभा होता.
"अग आई काय बोलतेस तू हे?तू एक सुशिक्षित स्त्री आहेस आणि त्याबरोबर एक निवृत्त शिक्षिका देखील आहेस.तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती.
मागील काही वर्षांपासून आई होण्यास व्याकुळ असलेली विभा बाबा होण्यास आतुरलेला मी खरंतर आपण सर्वच किती आतुरतेने वाट पहात होतो या क्षणांची.आज देवकृपेने हे दान आपल्या पदरी पडतेय.अग आमच्या प्रमाणे कितीतरी जोडपी अशी आहेत ,ज्यांना मुले होऊ शकली नाहीतआणि पुढे होण्याची शक्यता देखील नाही,आज देव ते सुख उशीरा का होइना आपल्याला देऊ पहात आहे आणि तू मात्र असा मुलगा -मुलगी भेदभाव करून त्याचा अव्हेर करीत आहेस.विहंगची आई काही न बोलता थोड्या नाराजीनेच तिथून निघून गेली आणि विहंगने धीर देत विभाला मिठीत घेतले.
            त्या दिवसापासून सासूबाई विभावर थोड्या नाराजच होत्या.खरं तर ह्या दिवसात विभाला त्यांच्या आधाराची खूप गरज होती.सुसंवाद तर दूरच पण अलिकडे त्या दोघींमध्ये साधा संवाद सुध्दा होत नव्हता.
विभाला या साऱ्या प्रकाराने खूप दडपण आले होते.मनात नसूनही आपल्याला मुलगाच व्हावा अशी ती अहोरात्र प्रार्थना करीत होती.
          विभाचे दिवस भरतआले होते.आज सकाळपासून तिला जरा अस्वस्थ वाटत होते.पहिलटकरीण असल्यामुळे मनात भीतीही होती.अशातच तिला रक्तस्त्राव सुरू झाला.लगेचच तिला हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.परंतु भिती आणि तणाव ह्यामुळे नैसर्गिक प्रसुतिमध्ये बाधा येत होती. त्यात बाळ किंवा आईपैकी कुणी एकच वाचू शकेल आम्ही आमच्या परीने  प्रयत्न करतो असे डाॅक्टर म्हणाले.
सर्वच खूप काळजीत होते.बाळ बाळंतीण सुखरूप राहावेत म्हणून प्रार्थना करीत होते.
आता मात्र विभाच्या सासूबाईना झाल्या प्रकाराबद्दल खूप पश्चाताप होत होता.
विभा तशी खूप गोड आणि लाघवी होती.लग्न होऊन घरात आल्यापासून तिने सासरी सर्वांची मने जिंकली होती.विहंगच्या  आई बाबांचे लेकीच्या मायेने सर्व करीत होती.तिच्याशिवाय खरेतर त्यांचे पानही हलत नव्हते.त्या सर्व आठवणींनी सासूबाई अस्वस्थ झाल्या होत्या.
इतक्यात नर्सने बाहेर येऊन ती गोड बातमी दिली."अभिनंदन ,तुमच्या घरात एका सुंदर कन्यारत्नाचे आगमन झाले आहे.आणि देवकृपेने बाळ बाळंतिण दोघीही सुखरूप आहेत.सासूबाईंसहीत सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
  काही वेळातच विभा आणि बाळाला आॅपरेशन  थिएटरमधून बाहेर आणले.विभा अर्धवट ग्लानीत होती.तिच्या उबदार कुशीत ते नुकतेच जन्मलेले गोरेपान लालचुटुक इवलेसे बाळ हाताच्या वळलेल्या गुलाबी मुठी चोखीत होते.
विहंगने हलकेच बाळाला विभाच्या कुशीतून
उचलून आईच्या हाती देत म्हणाला "आजीबाई ही घ्या तुमची नात." आईच्या उबदार कुशीतून बाहेर आल्याने बाळाने रडण्यास सुरुवात केली आणि ते गोंडस रूप पाहून आजीबाईंचे आनंदाश्रू अनावर झाले.आणि चिमुकलीला छातीशी कवटाळले.अर्धवट ग्लानीतून बाहेर येत असलेल्या विभाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.मनातील मळभ आता दूर झाले होते.विभाच्या मनात गाण्याच्या त्या ओळी रुंजी घालत होत्या."हरवेन मी हरपेन मी क्षितिजांतूही उगवेन मी"!!!!!!!!!!!!
                   वृषाली रूख्सार🌸




Comments

Popular posts from this blog

मेनोपाॅज

हॅपी मदर्स डे💐

रिश्ते