वाडी


काल माझ्या चुलत भावाच्या घराची वास्तुशांती ,गृहप्रवेश होता.घरातील कुठल्याही शुभकार्याला आमच्या वाडीतील ब्रम्हदेवाला नारळ वाढवून पूजा केली जाते.त्या निमित्ताने खूप वर्षांनी माहेरच्या वाडीत जाण्याचा योगआला.ब्रम्हदेवाच्या मंदिराजवळ जाण्यासाठी पुढे पाऊले टाकत असताना पूर्वीचे वाडीचे चित्र डोळ्यांसमोर तरळत होते.
वाडीला पाणी पुरवठा करणारी मंदिराशेजारची विहीर,मंदिरासमोरची गुलाबाची वाडी,आमची मोगर्याची वाडी,दांडाच्या(पाट) बाजूचे बेलाचे झाड,वाडीतील आंब्याची नारळी पोफळीची झाडे ,विहीरीच्या बाजूला असलेली सोनटक्क्याच्या फूलांची बाग.ब्रम्हदेवाच्या मंदिरासमोरून वळसा घालुन गेल्यावर आमच्या चुलत्यांची वाडी दुधी,पडवळ,कारली,शिराळे अशी फळभाज्यांची वाडी असायची.वरच्या पट्टीत माझी मोठी आई गवार ,कोथिंबीर लावायची.वाडी अगदी फुलांनी भाज्यांनी डवरलेली असायची.वाडीच्या सुरूवातीला आमचं बेडं आहे(फार्महाऊस) तिथे माझ्या काकांचा म्हशींचा तबेला होता.गायगोठा होता.
आता फक्त मोडकळीस आलेल्या बेड्याव्यतिरीक्त काही नाही.मोगऱ्याच्या वाडीच्या जागी माझ्या दादाने म्हणजे माझ्या मोठ्या चुलत भावाने सुंदर टुमदार दुमजली बंगला बांधला आहे.उरलेल्या जागेत थोडीफार केळ्याच्या झाडांची लागवड केलेली आहे.
तितकेच वाडी करीत असल्याचे समाधान.
               बाकी आता पूर्ण वाडी ओस पडलेली आहे.वाडीतील विहीर सुध्दा जिर्ण झालेली आहे.कधी ह्याच विहीरीच्या पायर्‍या उतरून माझी जीजी कपडे धुवायची.आम्ही सर्व भावंडे याच विहीरीत पोहायला शिकलो.विहीरीच्या पंपावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्व मस्ती करायचो ,एकमेकांवर पाणी उडवत आंघोळ करायचो. तो पंप आता तिथे नाही आहे.खूप लहान असताना ह्याच विहीरीवर  पंपा अगोदर रहाट होता.रहाटाला जुंपलेले बैल तो फिरणारा रहाट आता फक्त कल्पनाच करायची.
           आज वाडीभर तृणांचे रान माजलेले आहे.थोड्याफार केळीच्या बागा सोडल्यास पूर्ण वाडी ओस पडलेली.गुलाब मोगरा तर कुणी लागवड करीतच नाहीत.पूर्वी वाडी,दुधदूभते हा मुख्य व्यवसाय असायचा आणि नोकरी ही उत्पन्नाची दुसरी बाजू.मुंबईत नोकरी करीत असताना सुध्दा शेतीवाडीला प्राधान्य असायचे.
इतकेच काय पण एखाद्या घरी मुलगी लग्न करून द्यायची म्हंटले तरी घरची शेतीवाडी किती आहे? हा उत्पन्नाचे साधन म्हणून मुख्य प्रश्न असायचा.काळाच्या ओघात हे सर्व मागे पडत चालले आहे.वाडीतील जमिनीवर रान माजले आहे.वाड्या ओस पडत आहेत .घरातील करती सवरती मुले आता शैक्षणिक विकासावर भर त्यात प्रगतीपथावर आहेत.यू एस,यू के स्थाईक होत आहेत.किंवा चांगल्या भरभक्कम पगाराच्या नोकऱ्यांवर रूजू आहेत.इथल्या वाड्यांचे काय?हळूहळू एकत्र  कुटुंब पध्दती र्हास पावत चालली आहे.त्यामुळे त्या ठिकाणी एक नविन बंगला उभा राहणार.आणि त्यात आपल्या बायको मुलांसह यू एस,यू के ला स्थाईक झालेल्या मुलांचे म्हातारे आईबाबा घरात एकटेच.वर्ष दोन वर्षांत कधीतरी मुले येणार महिन्याभरासाठी ,हक्काचं घर आहेच की!!!
          आज वाडीत जाण्यापूर्वी जो आनंद होता,त्या सर्वावर विरजण पडले.गुलाब,मोगरा,शेवंती,जास्वंद ,कागड्याच्या जागी तृणांचे रान आहे.थोडीफार केळींची बागायत आहे.मन खिन्न झाले.
आमच्या प्रत्येक वाडीत ब्रम्हदेवाचे एक मंदिर असते.कारण ब्रम्हदेव वाडीचे रक्षण करतो ही त्या मागील भावना.त्याच्याशी जोडलेल्या अनेक कथा लहानपणापासून ऐकलेल्या.आज त्या ब्रम्हदेवास विचारावेसे वाटले,बाबा रे कुठल्या वाडीचे रक्षण करतो आहेस?
                                         @वृषाली रूख्सार.


Comments

Popular posts from this blog

मेनोपाॅज

हॅपी मदर्स डे💐

रिश्ते